ग्रामीण पत्रकारांच्या संघटनबळासाठी ‘गाव तिथे शाखा’ अभियान निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम; जळगाव जिल्ह्यात शाखा विस्ताराला ...
ग्रामीण पत्रकारांच्या संघटनबळासाठी ‘गाव तिथे शाखा’ अभियान
निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम; जळगाव जिल्ह्यात शाखा विस्ताराला लवकरच सुरुवात
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या समस्या, अडचणी आणि प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ‘गाव तिथे शाखा’ ही अभिनव संकल्पना लवकरच राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये संघटनेच्या शाखा स्थापन करून ग्रामीण पत्रकारांना एका संघटित व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण करणे, पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघटितपणे आवाज उठविणे, पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच ग्रामीण भागातील विविध समस्या शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे नियोजन निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष पत्रकार शब्बीर खान सरवर खान (रा. हिंगोणा, ता. यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि गावातील पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘गाव तिथे शाखा, प्रत्येक पत्रकारासोबत निर्भय पत्रकार संघटना’ या संकल्पनेतून पत्रकारांमध्ये एकता, सहकार्य आणि संघटनात्मक बळ निर्माण करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पत्रकारांना विविध स्तरांवर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटित प्रयत्न करण्यावर या उपक्रमात भर दिला जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकार मोठ्या संख्येने या संघटनेशी जोडले जावेत आणि पत्रकारांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळावे, यासाठी गावनिहाय शाखा विस्ताराचे नियोजन करण्यात येत आहे. आगामी काळात विविध तालुके व गावांमध्ये शाखा स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, त्याबाबतचे सविस्तर नियोजन लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पत्रकार शब्बीर खान यांनी दिली.

No comments