मनुदेवी माध्यमिक विद्यालयात 'चाईल्ड फ्रेंडली लीगल सर्विसेस' अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न भरत कोळी यावल (प्रतिनिधी): (...
मनुदेवी माध्यमिक विद्यालयात 'चाईल्ड फ्रेंडली लीगल सर्विसेस' अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
भरत कोळी यावल (प्रतिनिधी):
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
तालुका विधी सेवा समिती, यावल यांच्या वतीने आणि तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. आर. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आडगाव येथील मनुदेवी माध्यमिक विद्यालयात २४ सप्टेंबर रोजी 'चाईल्ड फ्रेंडली लीगल सर्विसेस फॉर चिल्ड्रेन' या उपक्रमांतर्गत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो कायदा २०१२) विषयावर विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून श्री. शशिकांत वारूळकर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, "बालक हे भारताचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यांच्या निकोप आणि बौद्धिक सर्वांगीण विकासासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करणे काळाची गरज आहे. भारतीय संविधानाचे कलम २१ प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार प्रदान करते. परंतु, बालकांचा विकास होत असताना त्यांना समाजातील अनेक विकृतींचा सामना करावा लागतो. या विकृतींना बालकांनी बळी पडू नये, यासाठी 'इलाजापेक्षा प्रतिबंध बरा' या उक्तीप्रमाणे बालकांना आधीच सतर्क व जागरूक करणे अत्यंत आवश्यक आहे." याच उद्देशाने यावल न्यायालयाच्या वतीने या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. जे. पाटील हे होते. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एन. एस. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. एस. आर. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. संजीव तडवी, अधिकार मित्र अजय बढे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments