शाडू मातीपासून गणपती बनविण्याच्या स्पर्धेत कु. लावण्या पाटील अमळनेर तालुक्यातून प्रथम ( पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत लावण्याने मिळविला प...
शाडू मातीपासून गणपती बनविण्याच्या स्पर्धेत कु. लावण्या पाटील अमळनेर तालुक्यातून प्रथम
( पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत लावण्याने मिळविला प्रथम क्रमांक; ३ हजारांचे पारितोषिक व पोलीस निरीक्षकांकडून विशेष सत्कार )
विकास पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
अमळनेर : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याला प्रोत्साहन दिले जात आहे.
याच उद्देशाने अमळनेर शहरात नुकतीच शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील विविध स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेत सहभागी झालेल्या कु. लावण्या काशिनाथ पाटील हिने शाडू मातीपासून अत्यंत सुबक, आकर्षक आणि कलात्मक गणेशमूर्ती साकारत परीक्षकांचे व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या उत्कृष्ट कलाकृतीची दखल घेत तिला अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला.
प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कु. लावण्या हिला प्रशस्तीपत्रक तसेच रोख ३ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तिच्या या उल्लेखनीय यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कु. लावण्या ही अमळनेर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी काशिनाथ नामदेव पाटील यांची कन्या आहे. तिच्या या यशाची विशेष दखल घेत अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी कु. लावण्या हिचा विशेष सत्कार करून तिला १ हजार रुपयांचे बक्षीस देत तिच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले.
लहान वयात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत लावण्याने मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद असून, तिच्या या यशामुळे पाटील कुटुंबीयांसह अमळनेर तालुक्याचेही नाव उज्ज्वल झाले आहे. कु. लावण्याच्या या यशाबद्दल तिचे मित्र-मैत्रिणी, गुरुजन, नातेवाईक तसेच हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments