adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्याचे चित्रकार अनिलराज पाटील यांच्या गणेशचित्राची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड नैनीताल येथील ‘मिट्टी से रंग तक’ संस्थेच्या गणेशोत्सव विशेष चित्रप्रदर्शनात महाराष्ट्रातून एकमेव सहभाग

  चोपड्याचे चित्रकार अनिलराज पाटील यांच्या गणेशचित्राची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड नैनीताल येथील ‘मिट्टी से रंग तक’ संस्थेच्या गणेशोत्...

 चोपड्याचे चित्रकार अनिलराज पाटील यांच्या गणेशचित्राची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

नैनीताल येथील ‘मिट्टी से रंग तक’ संस्थेच्या गणेशोत्सव विशेष चित्रप्रदर्शनात महाराष्ट्रातून एकमेव सहभाग




चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा : येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या चित्रकलेची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे चित्रकार अनिलराज पाटील यांच्या ‘सुपकर्ण’ या गणपती बाप्पांच्या आकर्षक चित्राची उत्तराखंडमधील नैनीताल येथील ‘मिट्टी से रंग तक’ या सांस्कृतिक संस्थेमार्फत आयोजित आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव विशेष चित्रप्रदर्शन व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात महाराष्ट्रातून सहभागी होणारे अनिलराज पाटील हे एकमेव चित्रकार असल्याचे सांगण्यात आले आहे.


गणेशोत्सवाचे औचित्य साधून संस्थेमार्फत सन २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चार गटांमध्ये श्री गणेशाच्या चित्रांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात विविध राज्यांसह देशातील अनेक बालचित्रकार, शालेय विद्यार्थी तसेच विविध कलावंतांनी आपापल्या कलाकृती सादर केल्या आहेत.


चित्रकार अनिलराज पाटील यांनी ‘सुपकर्ण’ या संकल्पनेतून गणपती बाप्पांचे सुंदर चित्र साकारले आहे. पेन-इंकच्या सहाय्याने तसेच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ‘स्टिपलिंग’ शैलीत त्यांनी हे चित्र रेखाटले असून, या कलाकृतीची संस्थेच्या निवड समितीने प्रदर्शनासाठी निवड केली आहे.


नैनीताल येथे होणाऱ्या या चित्रप्रदर्शनाला २६ सप्टेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ‘मिट्टी से रंग तक’ संस्थेच्या फाउंडर व अध्यक्षा चित्रकार डॉ. पूनम तसेच संपूर्ण समितीने अनिलराज पाटील यांच्या कलाकृतीची निवड करून त्यांचे अभिनंदन केले असून, पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


चित्रकार अनिलराज पाटील यांनी यापूर्वीही विविध चित्रकला पुरस्कार प्राप्त केले असून, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदविला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्टिपलिंग शैलीतून त्यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविला आहे.


चोपडा येथील चित्रकाराची कलाकृती आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनासाठी निवड झाल्याने चोपडा तालुक्याच्या कला क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments