शिक्षक दिनानिमित्त मनविसेतर्फे शाळांमध्ये प्राथमिक उपचार पेटीचे वाटप; शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान नायगाव ता.यावल प्रतिनिधी (संपादक -...
शिक्षक दिनानिमित्त मनविसेतर्फे शाळांमध्ये प्राथमिक उपचार पेटीचे वाटप; शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान
नायगाव ता.यावल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नायगाव, दि. ५ सप्टेंबर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने किनगाव जिल्हा परिषद केंद्रांतर्गत येणाऱ्या विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्राथमिक उपचार पेटीचे वाटप तसेच सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
किनगाव, नायगाव, मालोद, खालकोट, निमछाव, इचखेडा आणि वाघझिरा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांना प्राथमिक उपचार पेटी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांमध्ये प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. या सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांनी शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, समाज घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी सातपुडा माध्यमिक विद्यालय, नायगावचे मुख्याध्यापक संजय देवरे सर, नेहरू विद्यालय किनगावचे मुख्याध्यापक रविंद्र सोनवणे सर, जि. प. प्राथमिक शाळा खालकोटचे मुख्याध्यापक प्रशांत बाविस्कर सर, जि. प. प्राथमिक शाळा इचखेडाचे मुख्याध्यापक पाटील सर, जि. प. प्राथमिक शाळा वाघझिराचे मुख्याध्यापक तडवी सर, तसेच सातपुडा माध्यमिक विद्यालय नायगावचे शिक्षक सूर्यवंशी सर, बोबडे सर, तडवी सर, माजी शिक्षक बी. डी. पतीला सर, डी. जे. पाटील सर, माजी मुख्याध्यापक नायदे सर यांच्यासह विद्यार्थी मित्र उपस्थित होते.
“शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारा व्यक्ती नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारा खरा शिल्पकार आहे. शिक्षकांच्या सन्मानासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घेणे हीदेखील आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

No comments