पीकविमा अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी दूर करा; शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करा चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या किसान सेल तर्फे...
पीकविमा अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी दूर करा; शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करा
चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या किसान सेल तर्फे तहसीलदारांना निवेदन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपड : पीकविमा योजनेअंतर्गत अर्ज भरताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून सीएससी (CSC) केंद्रांच्या माध्यमातून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत करावी, तसेच पर्यायी ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा भैय्यासाहेब ॲड संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या किसान सेल च्या वतीने तहसीलदार, चोपडा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
शासनाच्या माध्यमातून पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता सीएससी केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अनेक सीएससी केंद्रांवरील आयडी (ID) बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचे अर्ज भरता येत नसल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची गैरसोय होत असून अर्ज भरण्याची प्रक्रिया रखडली आहे. निर्धारित मुदतीत अर्ज सादर करता न आल्यास शेतकऱ्यांना पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीने प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत.
१. बंद झालेल्या सीएससी केंद्रांच्या आयडी तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
२. आयडी सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज भरण्यासाठी पर्यायी ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून द्यावी.
३. तालुका व गावपातळीवर अधिकृत पर्यायी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांचे अर्ज वेळेत भरले जातील, याची खात्री करावी.
४. सीएससी केंद्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरता न आलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक मुदतवाढ व इतर योग्य उपाययोजना कराव्यात.
पीकविमा हा शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असून तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणे अन्यायकारक आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाला तातडीने निर्देश द्यावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष मोहन पाटील,माजी शहराध्यक्ष के डी चौधरी, धनंजय पाटील, जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर सांगोरे, प्रमोद पाटील,नगरसेवक रमाकांत ठाकूर,जिल्हा सचिव आरिफ शेख, किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे, नगरसेवक अमोल पाटील, डॉ रवींद्र निकम,गोपाल धनगर,छन्नू पाटील, राजेंद्र पाटील,,ॲड एस डी पाटील, शांताराम लोहार, यशवंत खैरनार, सतीश पाटील, सुनील बागुले,देविदास पाटील, गोविंदा पाटील, राजेंद्र चौधरी, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर कोळी,देवकांत चौधरी, अनिल सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments