यावल नगरपरिषदेच्या राजकारणात खळबळ! नगरसेवक शेख निसार हमीद अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय यावल भरत कोळी (संपादक : हेमकांत गायक...
यावल नगरपरिषदेच्या राजकारणात खळबळ! नगरसेवक शेख निसार हमीद अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
यावल भरत कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल तालुका प्रतिनिधी नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा निर्णय जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिला आहे. प्रभाग क्रमांक ५-अ चे नगरसेवक शेख निसार हमीद यांना अपात्र घोषित करण्यात आले असून, त्यांचे नगरसेवक पद रिक्त झाल्याचे वृत्त आहे. या निर्णयामुळे यावल शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नेमके प्रकरण काय?
यावल येथील उमेश रेवा फेगडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. सन २०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शेख निसार हमीद यांनी सादर केलेल्या शपथपत्रातील अपत्यांच्या संख्येबाबत आक्षेप घेण्यात आला होता.
तक्रारीनुसार, शपथपत्रात १२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या शून्य नमूद करण्यात आली होती. मात्र, संबंधित अपत्याचा जन्म ६ जून २००३ रोजी झाल्याचा दावा तक्रारदाराने केला होता.
जन्मनोंदी ठरल्या महत्त्वपूर्ण
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान यावल नगरपरिषदेच्या जन्मनोंदवहीतील नोंदी तसेच दोन शाळांमधील अभिलेखांचा विचार करण्यात आला. संबंधित नोंदींमध्ये जन्मतारीख ६ जून २००३ अशी असल्याचे वृत्तात नमूद आहे.
दुसरीकडे, शेख निसार हमीद यांनी संबंधित अपत्याचा जन्म २९ ऑगस्ट २००१ रोजी भुसावळ येथे झाल्याचा दावा करत कागदपत्रे सादर केली होती. यावल नगरपरिषदेतील जन्मनोंद चुकीची असल्याचे सांगून ती रद्द करण्यासाठी अर्ज केल्याची बाजूही त्यांनी मांडली होती.
मात्र, जन्मनोंद रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम झाली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध अधिकृत नोंदींचा विचार केला. त्यानंतर उमेश फेगडे यांचा अपात्रतेसंबंधी अर्ज मंजूर करण्यात आला.

No comments