समता फाउंडेशनच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण, फॅशन डिझायनिंग आणि रोजगाराच्या संधींची माहिती लोहारा आश्रमशाळेत १२५ विद्यार्...
समता फाउंडेशनच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण, फॅशन डिझायनिंग आणि रोजगाराच्या संधींची माहिती
लोहारा आश्रमशाळेत १२५ विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
समता फाउंडेशनच्या करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत लोकसेवक मधुकरराव चौधरी आश्रमशाळा, लोहारा येथे नववी आणि दहावीच्या एकूण १२५ विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक संधी, तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम, कौशल्य विकास आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी फैजपूर येथील जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे उपप्राचार्य व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जी. ई. चौधरी आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. पी. पी. थोंबरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शितल पाटील यांचे सहकार्य लाभले. तसेच समता फाउंडेशनच्या एफडी टीमच्या सुपरवायझर श्रीमती आशा सुनील तडवी यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात आणि विद्यार्थ्यांपर्यंत करिअरविषयक माहिती पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
श्रीमती आशा सुनील तडवी या भुसावळ विभागातील नऊ शाळांची जबाबदारी सांभाळत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफडी टीम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध संधींची माहिती मिळावी, त्यांनी आपल्या आवडीनुसार योग्य अभ्यासक्रम निवडावा आणि भविष्यात स्वावलंबी बनावे, या उद्देशाने समता फाउंडेशनच्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येत आहे.
मागील वर्षी समता फाउंडेशनच्या करिअर मार्गदर्शन उपक्रमातून सुमारे २०० विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला. यामध्ये आयटीआय, अभियांत्रिकी, डी. फार्मसी, नर्सिंग, बी.एड. तसेच इतर विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रमांचा समावेश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी समजून घेण्यास आणि स्वतःच्या भविष्यासाठी योग्य दिशा निवडण्यास मदत झाली.
कार्यक्रमात आयटीआयमधील इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, कोपा (COPA), मेकॅनिक, वायरमन आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक यांसारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा अभ्यासक्रम, त्यांची पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच फॅशन डिझायनिंग आणि ड्रेस मेकिंग या क्षेत्रांतील अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. शिवणकाम, भरतकाम, कपड्यांची निर्मिती, प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण आणि या क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तांत्रिक शिक्षणासोबतच १२५ शिक्षणातूनही चांगल्या करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमामुळे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर कोणते अभ्यासक्रम निवडता येतात, विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश कसा मिळवता येतो आणि भविष्यात रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती मिळाली.
समता फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही आयटीआय, अभियांत्रिकी महाविद्यालये, नर्सिंग कॉलेज आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व प्रवेश प्रक्रियेसाठी सहकार्य करण्याचे कार्य सुरू राहणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल डॉ. जी. ई. चौधरी आणि डॉ. पी. पी. थोंबरे यांचे आभार मानण्यात आले. मुख्याध्यापिका श्रीमती शितल पाटील यांच्या सहकार्याने आणि समता फाउंडेशनच्या एफडी टीमच्या प्रयत्नांतून हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला.


No comments