नवीन नळ कनेक्शन फीमध्ये सवलत द्या; लहूजी विद्रोही सेनेची खामगाव नगर परिषदेकडे मागणी सदर केलेले निवेदन प्रत पल्लवी पाटील खामगाव (संपा...
नवीन नळ कनेक्शन फीमध्ये सवलत द्या; लहूजी विद्रोही सेनेची खामगाव नगर परिषदेकडे मागणी
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक : हेमकांत गायकवाड)
खामगाव : नगर परिषदेमार्फत नवीन नळ कनेक्शन देण्याची मोहीम सुरू असून, या प्रक्रियेत आकारण्यात येणाऱ्या रकमेबाबत नागरिकांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी लहूजी विद्रोही सेनेच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी नगर परिषदेकडून आकारण्यात येणारी रक्कम अनेक नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीची ठरत आहे. त्यामुळे नळ कनेक्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांना ही रक्कम एकरकमी भरण्याऐवजी तीन टप्प्यांमध्ये सवलतीसह भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना नळ कनेक्शन घेणे सहज शक्य व्हावे, यासाठी नगर परिषद प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, परिसरातील सागर अवसरे सह नागरिकांच्या घरासमोर नवीन विद्युत खांब बसविण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी परिसरात अंधार असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, अंधाराचा फायदा घेत असामाजिक प्रवृत्तींच्या लोकांकडून गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच परिसरात वाढलेली वाहनांची वर्दळ लक्षात घेता साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे चौक ते सागर अवसरे यांच्या घरापर्यंत गट बसवून देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे या विविध मागण्यांसंदर्भात लहूजी विद्रोही सेनेच्या वतीने खामगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना लहूजी विद्रोही सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments