सावदा शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा १३ नोव्हेंबर रोजी सावदा शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा – सूरज परदेशी रावेर प...
सावदा शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा १३ नोव्हेंबर रोजी सावदा शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा – सूरज परदेशी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
सावदा शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांचा पाठलाग करणे, दुचाकीस्वारांच्या वाहनांवर धावून जाणे तसेच लहान मुलांवर हल्ला करण्याच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत.
या गंभीर समस्येची दखल घेत सूरज परदेशी, शिवसेना शहर प्रमुख सावदा तथा नगरसेवक सावदा यांनी सावदा नगरपालिका प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नगरपालिकेला ७ दिवसांची मुदत
सावदा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करून निवेदन प्राप्त झाल्यापासून ७ दिवसांच्या आत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यामध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण, नियमानुसार निर्बीजीकरण व लसीकरण, आक्रमक कुत्र्यांबाबत आवश्यक उपाययोजना तसेच शाळा, बाजारपेठ, रुग्णालये आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
१३ नोव्हेंबर रोजी सावदा शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन
सदरील निवेदनाची सावदा नगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस कार्यवाही करावी. अन्यथा, येत्या १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सावदा शिवसेनेच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी.
नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे सहन केले जाणार नाही. प्रशासनाने आंदोलनाची वेळ येण्यापूर्वीच तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, असा स्पष्ट इशारा सूरज परदेशी यांनी दिला आहे.

No comments