न्हावीचा आर्यन चौधरी सलग दुसऱ्या वर्षी इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी पात्र! नोबेल सायन्स टॅलेंट सर्च २०२६ परीक्षेत उत्कृष्ट यश; डॉ. उल्हास पाटील स...
न्हावीचा आर्यन चौधरी सलग दुसऱ्या वर्षी इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी पात्र! नोबेल सायन्स टॅलेंट सर्च २०२६ परीक्षेत उत्कृष्ट यश;
डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कूलमधून इस्रो दौऱ्यासाठी निवड होणारा पहिलाच विद्यार्थी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी.बी.एस.ई. स्कूल, सावदा येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी चि. आर्यन सागर चौधरी याने नोबेल सायन्स टॅलेंट सर्च २०२६ ही परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे त्याची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, आर्यनने २०२५ मध्येही नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा दिली होती. त्यावेळी देखील त्याची इस्रो स्टडी टूरसाठी निवड झाली होती. सलग दुसऱ्या वर्षी इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी निवड होण्याचा मान मिळवून त्याने आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा चमक दाखवली आहे.
आर्यनच्या या यशामागे त्याचे अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनत आहे. तसेच शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांनी दिलेले प्रोत्साहन यांचाही त्याच्या यशात मोलाचा वाटा आहे.
विशेष अभिमानाची बाब म्हणजे, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी.बी.एस.ई. स्कूलमधून इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी निवड होणारा आर्यन सागर चौधरी हा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. आर्यन हा शिक्षण प्रसारक मंडळ, न्हावीचे संचालक श्री. सागर मधुकर चौधरी यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत असून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आर्यनच्या या यशामुळे न्हावी गावासह परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments