रावेर तालुक्यात लाकूड तस्करीचा धुमाकूळ; वन विभागाचे नियंत्रण नेमके कुठे हरवले? हिरव्यागार वृक्षांची खुलेआम कत्तल अन् विनापरवाना लाकूड वाहत...
रावेर तालुक्यात लाकूड तस्करीचा धुमाकूळ; वन विभागाचे नियंत्रण नेमके कुठे हरवले?
हिरव्यागार वृक्षांची खुलेआम कत्तल अन् विनापरवाना लाकूड वाहतूक सुरूच! वनपाल, नाकेदारांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह; महसूल प्रशासनाच्या भूमिकेकडेही नागरिकांचे लक्ष!
रावेर प्रतिनिधी : मुबारक तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यात अवैध वृक्षतोड आणि विनापरवाना लाकूड वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. तालुक्यातील विविध भागांत हिरव्यागार वृक्षांची खुलेआम कत्तल होत असल्याच्या तक्रारी समोर येत असतानाच तोडलेल्या लाकडांची वाहतूकही सर्रास सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रकारांना आळा घालण्यासाठी वन विभागाकडून प्रभावी कारवाई होताना दिसत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
वृक्षसंवर्धनाच्या घोषणा एका बाजूला, प्रत्यक्षात वृक्षांची कत्तल दुसऱ्या बाजूला!
शासनाकडून दरवर्षी वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन आणि वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी विविध अभियान राबविले जातात. मात्र, रावेर तालुक्यात हिरव्यागार वृक्षांची तोड होत असल्याच्या तक्रारींमुळे या अभियानांच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वृक्षतोडीनंतर लाकडांची वाहतूक विविध मार्गांवरून होत असल्याची चर्चा असताना संबंधित वाहनांची तपासणी आणि परवान्यांची पडताळणी नेमकी किती प्रमाणात केली जाते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
वनपाल, नाकेदारांची गस्त केवळ कागदावरच?
वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड रोखणे, लाकूड वाहतुकीवर लक्ष ठेवणे आणि संशयास्पद हालचालींवर कारवाई करणे ही वन विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. असे असताना विनापरवाना लाकूड वाहतूक करणारी वाहने रस्त्यांवरून जात असल्याच्या तक्रारी समोर येत असतील, तर संबंधित वनपाल, नाकेदार आणि कर्मचाऱ्यांची गस्त किती प्रभावी आहे? अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियमित तपासणी आणि कारवाई का होत नाही? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
लाकूड वखारींची तपासणी होणार कधी?
तालुक्यातील खासगी लाकूड वखारींमध्ये उपलब्ध असलेल्या लाकडांच्या साठ्यांची तपासणी, लाकूड खरेदी-विक्रीची कागदपत्रे, वृक्षतोडीचे परवाने आणि वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी जोर धरत आहे. लाकूड कुठून आणले जाते, त्याची तोड अधिकृत आहे का आणि वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
वन विभागासह महसूल प्रशासनाची जबाबदारीही महत्त्वाची!
अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीच्या तक्रारींकडे केवळ वन विभागानेच नव्हे, तर संबंधित अधिकारक्षेत्रानुसार महसूल प्रशासनानेही लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन्ही विभागांमध्ये समन्वयाने कारवाई होताना दिसते का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागांनी एकमेकांकडे जबाबदारी ढकलण्याऐवजी संयुक्त तपासणी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी आता तरी झोपेतून जागे व्हावे!
रावेर तालुक्यातील अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीच्या तक्रारींची वनक्षेत्रपाल तसेच उपवनसंरक्षक यांनी तातडीने दखल घ्यावी. तालुक्यातील संशयित लाकूड वखारी, लाकडांचे साठे आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी. तसेच वनपाल, नाकेदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन कर्तव्यात कसूर आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून होत आहे.
आता प्रश्न एकच आहे, रावेर तालुक्यातील हिरवीगार वनसंपत्ती वाचविण्यासाठी वन विभाग प्रत्यक्ष मैदानात उतरणार की अवैध वृक्षतोडीच्या तक्रारींकडे असेच दुर्लक्ष होत राहणार? वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करतात की नाही, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


No comments