खत वितरण प्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी आमदार अमोल जावळे यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी; नऊ महत्त्वपूर्ण सुधारणांचे प्रस्ताव सादर भरत क...
खत वितरण प्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी आमदार अमोल जावळे यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी; नऊ महत्त्वपूर्ण सुधारणांचे प्रस्ताव सादर
भरत कोळी यावल
(संपादक - हेमकांत गायकवाड)
रासायनिक खतांच्या वितरण प्रक्रियेत शेतकरी, सहकारी संस्था आणि खासगी खत विक्रेत्यांना येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणी दूर करून खत वितरण व्यवस्था अधिक सुलभ व पारदर्शक करण्याची मागणी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खत विभागाचे संयुक्त सचिव श्री. कृष्णकांत पाठक यांना निवेदन सादर केले आहे.
सध्या ‘Framework for Fertilizer Sale’ प्रणालीद्वारे खत वितरण करताना शेतकऱ्यांना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतीची गरज आणि उपलब्ध खत वितरण प्रणाली यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार जावळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनात प्रामुख्याने नऊ महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. यामध्ये कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार पिकनिहाय खतांचा कोटा निश्चित करणे, प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्रानुसार खतांचे प्रमाण ठरविणे, NPK घटकांच्या प्रमाणानुसार खतांचे नियोजन करणे आणि बहुपिक पद्धतीनुसार स्वतंत्र खत कोट्याची सुविधा उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
तसेच कृषी विद्यापीठांच्या सुधारित शिफारशींचा डेटाबेस नियमित अद्ययावत करणे, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त गावाबाहेर राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी Nominee नोंदणीची सुविधा उपलब्ध करणे, प्रत्येक व्यवहारासाठी शेतकऱ्याच्या मोबाईलवर वारंवार OTP मागविण्याऐवजी नोंदणीकृत Nominee च्या माध्यमातून OTP पडताळणी करणे आणि बारकोड स्कॅनिंगद्वारे खत वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करणे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
याशिवाय प्रणालीतील तांत्रिक अडचणींचे कायमस्वरूपी निराकरण होईपर्यंत सहकारी संस्था व खासगी खत विक्रेत्यांच्या माध्यमातून पर्यायी खत वितरण व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाची अपेक्षा
या प्रश्नावर केवळ केंद्र स्तरावर निर्णय न घेता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, सहकार विभाग आणि संबंधित तांत्रिक विभागांची संयुक्त बैठक आयोजित करून शेतकरी, सहकारी संस्था व खासगी खत विक्रेत्यांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेण्याची मागणी आमदार जावळे यांनी केली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून या प्रणालीत आवश्यक तांत्रिक सुधारणा करून शेतकऱ्यांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि शेतकरी हिताची व्हावी, तसेच शेतकऱ्यांना पिकांच्या गरजेनुसार वेळेत खते उपलब्ध व्हावीत, हा या निवेदनामागील मुख्य उद्देश आहे. याबाबत संबंधित विभागांनी गांभीर्याने विचार करून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही आमदार अमोल जावळे यांनी केली आहे.

No comments