आई-वडिलांचे छत्र हरपले, पण स्वप्नांचा ध्यास कायम! सिद्धार्थ गजरे यांची UPSC (ESE) परीक्षेत देशात ५० वी रँक. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राव...
आई-वडिलांचे छत्र हरपले, पण स्वप्नांचा ध्यास कायम! सिद्धार्थ गजरे यांची UPSC (ESE) परीक्षेत देशात ५० वी रँक.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रावेरच्या सुपुत्राची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी :-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
आयुष्यात कितीही संकटे आली, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मनात जिद्द आणि ध्येयाप्रती प्रामाणिक निष्ठा असेल तर यशाचा मार्ग निश्चितच गाठता येतो, हे रावेर येथील चि. सिद्धार्थ चंद्रमणी गजरे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपले, आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला; मात्र या दुःखद परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी UPSC (ESE) 2025 परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर ५० वी रँक (AIR 50) मिळवून रावेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.सिद्धार्थ यांचे वडील चंद्रमणी गजरे हे भारतीय जीवन विमा महामंडळात (LIC) विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. सामाजिक बांधिलकी जपणारे, मनमिळाऊ आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या मुलांमध्ये माणुसकी, सामाजिक जाणीव आणि कष्ट करण्याचे संस्कार रुजवले होते. मात्र, सिद्धार्थ अवघ्या ११ वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
वडिलांच्या निधनानंतर आई जिजाबाई चंद्रमणी गजरे यांनी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्या कमलाबाई अग्रवाल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. स्वतःची नोकरी सांभाळून मुलांचे शिक्षण, घर आणि कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी मोठ्या धैर्याने पार पाडल्या. प्रकृतीच्या अडचणी असतानाही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले. मात्र, नियतीच्या कठोर आघाताने सिद्धार्थ यांना आईची साथही गमवावी लागली.आई-वडील दोघांचेही छत्र हरपल्यानंतर निर्माण झालेली पोकळी, आयुष्यातील वाढत्या जबाबदाऱ्या आणि अनेक अडचणी यांवर मात करत सिद्धार्थ यांनी आपल्या ध्येयापासून कधीही माघार घेतली नाही. कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य, प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी UPSC (ESE) सारख्या अत्यंत कठीण परीक्षेत देशात ५० वी रँक मिळवण्याचा बहुमान संपादन केला. या संघर्षमय प्रवासात त्यांच्या मोठ्या बहिणीची साथही मोलाची ठरली.सिद्धार्थ यांचे हे यश केवळ एका परीक्षेतील यश नसून संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाचा विजय आहे. आई-वडिलांनी पाहिलेली स्वप्ने आज त्यांच्या कर्तृत्वातून साकार होत आहेत. आई-वडील आज प्रत्यक्षात सोबत नसले, तरी त्यांनी दिलेले संस्कार, शिकवण आणि मूल्यांची शिदोरी सिद्धार्थ यांच्या यशातून कायम जिवंत राहणार आहे.विशेष म्हणजे, सिद्धार्थ गजरे पुढील महिन्यात सेवेत रुजू होणार आहेत. त्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीमुळे गजरे कुटुंबासह रावेर शहर आणि संपूर्ण तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आई-वडिलांचे स्वप्न, मोठ्या बहिणीची साथ आणि स्वतःच्या जिद्दीच्या बळावर यशाचे शिखर गाठणाऱ्या सिद्धार्थ गजरे यांचा संघर्षमय प्रवास आज अनेक विद्यार्थी आणि तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.चि. सिद्धार्थ चंद्रमणी गजरे यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील प्रशासकीय व व्यावसायिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

No comments